वाड़मयीन सेवक
श्रीनागनाथांच्या अवतार कार्यानंतर सर्व संतांनी (शिष्यांनी) श्री नागनाथांचीचरित्र माहिती गद्य वा पद्य किंवा इतर प्रकारात रचना करुन श्रीनागेश संप्रदायाचे महत्व व महती वाढवली व श्री नागेशांचा कृपार्शिवाद मिळविला अशा सर्व संतांचा (सांप्रदायीक वाङमयीन सेवकांचा) यात समावेश होतो.
श्रीअज्ञानसिध्द :-
श्रीहेग्रसास अहिल्या नावाची एक मुलगी होती.ती मसूर गांवी दिली होती.तिला 3 मुले होती(श्रीअज्ञानसिद्ध, श्रीविदेहसिद्ध व श्रीनरेंद्रसिद्ध).अहिल्याने पुत्र प्राप्तीसाठी श्रीनागनाथास नवस केला होता, तेव्हा श्रीनागनाथांच्या कृपेनेच श्रीअज्ञानसिद्धांचा जन्म झाला होता. बालपणापासून हे अत्यंत विरक्त होते.यावेळी श्रीनागनाथ गुप्त झाले होते.श्रीअज्ञानसिद्ध हे महायोगी होते. व श्रीनागनाथांवर त्यांचे नि:सीम प्रेम होते, पुढे गुर्वाज्ञेवरून यांना नरंदे येथे जावे लागले व तेथेच त्यांनी माघ शुद्ध पंचमीला जिवंत समाधी घेतली. यांनी संकटहरणी, नागेश माहात्म्य, पंचीकरण प्रमेय, काळज्ञान, वरद नागेश, देवकी माहात्म्य, सप्तकोटेश माहात्म्य, स्वरूप निर्वाण, श्रीगुरुसाम्राज्य, जीवब्रम्हाभेदलक्षण, अकळकांड, पृच्छापत्र इतर स्फुट काव्ये, तसेच अभंग, साकी, आरती, फाकी असे विपुल ग्रंथ रचना केली, याची वाणी प्रासादिक असून अभंगाचा विषय अध्यात्मपर अथवा उपदेशपर आहे.
श्रीआलमखान :-
आलमखान हा पठाण गृहस्थ होता. हा श्रीअज्ञानसिद्धांचे नंतर म्हणजे शके 1400 च्या सुमारास होऊन गेला, यास लहानपणी तीरकमाटी खेळण्याचा नाद असे.एकदा तो असाच खेळत असता त्याचा तीर चुकून समोरुन पाणी भरुन घेऊन येत असलेल्या त्याच्या भावजयीस लागला.लगेच तिने आपल्या नवज्यास आलमखानाची दुष्ट वासना असल्याबद्दल बरेच सांगितले, त्याबरोबर ते त्यास मारण्यास आले.आपल्याबद्दल आपल्या भावांनी असा विपरीत संशय घेतल्याबद्दल त्याला फार वाईट वाटले.हे आपणास मारणार असे पाहून तो पळत सुुटला.पळता पळता एका दगडामागे लपला.भावांना तो दगड व्याघ्र दिसू लागला.भावांना याचे आश्चर्य वाटले.त्यांचा राग नाहीसा झाला. इतक्यात दगडातून अवाज आला की जेथे तुला न मागतां भाकरीमिळेल तेथे तुझे सद्गुरु आहेत. भावांनी आलमखानास घरी चलण्यास सांगितले, परंतु आलमखानानी ते ऐकले नाही.तो फिरत फिरत वडवाळ येथे आला.खर्गतीर्थात स्नान करून येतो तोच तेथे कोणीतरी त्याचे पुढे भाकरी आणून ठेविली.यावरुन आपले सद्गुरु येथेच असल्याची खात्री पटली.यावेळी श्रीनागनाथ गुप्त झालेले होते.त्याने देवळात जाऊन मुर्तींसमोर उपोषण केले.मुर्तींमागून एक स्त्री आकृती प्रगट झाली व म्हणाली-‘ तू बीदर येथे जा, तेथे तुझे कल्याण होईल.’ तेथे त्यांनी शिपायाची नोकरी केली.पुढे तो किल्लेदार बनला. अश्यावेळी श्रीनागनाथांनी तेथे जाऊन त्यास दर्शन दिले.हा श्रींचा एकनिष्ठ भक्त होता.याने शुद्ध मराठीमध्ये सुंदर रसाळ अशी पदे केली.ही पदे अध्यात्मपर व उपदेशपूर्ण असून भक्तिरस परिपूर्ण आहेत.
श्रीदत्तचैतन्य :-
हे श्रीअज्ञानसिद्धांचे शिष्य होते.श्रीनागनाथांवर त्यांची पूर्णनिष्ठा होती.गुरू अज्ञानसिद्धांच्या कृपेने यांना आत्मज्ञान प्राप्त झाले होते.नरंद्यास श्रीअज्ञानसिद्धांच्या समाधीच्यावेळी हे त्यांचेजवळ होते.यांनी कांही अभंग केले आहेत.
श्रीएकलिंग तेली :
एकलिंग तेली हे मानूर गावचे.हे श्री नागनाथांचे शिष्य होत.एकलिंगाने स्वसामर्थ्याने वरदम्मा या लिंगायत मुलीस जिवंत केले.ह्या एकलिंगाने वडवाळ येथील श्री नागनाथांचे मंदिर स्वहस्ते बांधले आहे. एकलिंग गुरूप्रसादाने ज्ञानी बनले, त्यानी ‘आत्मसार ‘ हा ग्रंथ लिहिला आहे. कांही अभंग, आरती यांची रचना केलेली दिसते.उपलब्ध असलेले आरती प्रस्तुत ग्रंथात आहे.
श्रीसिद्धराम:
हे महागांव येथे होऊन गेले.महागांव हे ठिकाण गुलबर्ग्याजवळ आहे.हे श्रीनागनाथांचे मोठे भक्त होते.हे सुमारे तीन-साडेतीनशे वर्षापूर्वी होऊन गेले.यांचे घराणे तेथे चालू आहे.येथेही श्रीनागनाथांचे स्थान आहे.त्या गांवाची जहागिर मोगलाईतून या घराण्याकडे आली आहे.
श्रीअवधूत :
हे देगांव येथे राहाणारे सोनार गृहस्थ अंदाजे दोनशे वर्षापुर्वी होऊन गेले.हेश्रीनागनाथांचे पूर्ण भक्त होते.यांनी पुष्कळ पदे केली आहेत.त्यापैकी कांही मराठीत व कांही हिंदीत आहेत. यांची भाषा फार प्रेमळ आहे.
श्रीरघुनाथबुवा :
यांचा परंपरेने चालत आलेला मठ किल्लारी येथे आहे.यास सुमारे दीडशे वर्षे झाली.हे नागनाथ भक्त होते.यांनी चक्री भजन रचले.ते दरवर्षी मोहोळ येथे यात्रेत म्हंटले जाते.
श्रीनरहरबुवा :
हे हेग्रस वंशातील होत.यांच्या वडिलाचे नांव लक्ष्मणबुवा होते.यांनी ‘ सिद्धान्त रत्नाकर ‘ नावाचा 4419 ओव्यांचा ग्रंथ रचला.कांही अभंग व आरत्याही आहेत.
श्रीभुजंगबुवा :
हे श्रीहेग्रसांचे पणतू होत. यांचे कांही अभंग उपलब्ध आहेत.
श्रीकान्हूराज (कान्होबा) पाठक :
श्रीनागनाथ यांच्या आशिर्वादाने पुर्वायुष्यात भरपूर साधना व ध्यानधारणा केलेली आहे.त्यांनी गृहस्थाश्रम स्विकारलेला असला तरी ते संसारात कधी रमले नाहीत.त्यांची वृत्ती संन्याशाला योग्य अशीच होती.अयाचित वृत्तीने ते राहत होते.त्यांना प्रयाण सिध्दी प्राप्त होती.पहाटे गंगेमध्ये स्नान करुन श्रीकाशीविश्वेश्वराचे दर्शन घेत असत तेथून ते आपली कुलस्वामीनी रेणुकामातेच्या दर्शनास माहूरगडावर जाऊन तेथे दर्शन घेवून केंदूर गांवी परत येत असत. एके दिवशी कान्होबांना गंगेत तीन बाण सापडले. ते तीन बाण नित्य पुजेत ठेवून कांही दिवसांनी आपल्या सद्गुरुंनी आपल्या आजोंबांच्या (पिलाजी) काळात ज्या ठिकाणी लीला घडवून आणल्या त्या ठिकाणी या शिव बाणांची स्थापना केली.त्या मंदिरांना श्रीनागेश्वर हे नामाभिधान ठेविले.सदर मंदिरे आजही आपणाला 1.पाबळ 2.कान्हूर मेसाई 3.निमगांव (खंडोबाचे) या गावी पहावयास मिळतात.
तसेच कान्होबा पाठकांनी श्री ज्ञानेश्वरादी भावंडाचा काही काळ सांभाळ केलेला आहे.व ही भावंडे त्यांना आजोबा या नात्याने मानत असत.यांची अध्यात्मिक चर्चा गावांबाहेरील आंब्याच्याझाडाखाली होत असे.त्या झाडाला गुढगुंजन असे संबोधतात व ते झाड आजमितीस ही त्यांची साक्ष देत उभे आहे.उल्लेखनीय म्हणजे श्री ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी घेतली असता श्री कान्होबांनी स्वांत्वनपर भाषण (किर्तन) केले.व आजही हा मान त्यांच्या वंशजाकडे परंपरेने आहे. यांनी काही अभंग रचना केलेल्या आहेत.
श्रीबोलेराम :
हे देगाव येथील ब्राम्हण होते.हे श्रीनागनाथांचे एकनिष्ठ भक्त होते.हे त्यांचे समकालीन होते.यांनी कांही अभंग, आरती रचना केली आहे.
या वाङमयीन सेवकासमवेत इतर संप्रदायातीलसंतांची अभंगरचनाव साहित्य उपलब्ध असून ते यासंप्रदायात म्हंटले जाते. मध्वनाथ,श्रीधर,मन्मथस्वामी, केशवचैतन्य, निरंजनपुरी, रेवणसिध्द, बसवलिंग, बसवेश्वर, जमाल फकीर, बाजीनाथ, नारायण, नरोबा, लिंबनाथ, लिंगेश्वर, गुरुदास, मारुतीबुवा, तसेच कांही अपरिचीत संतांची रचना उपलब्ध आहेत.