श्री तिमण्णां धनगर
एका रानात तिमण्णा नावाचा एक धनगराचा मुलगा शेळ्या राखीत होता.श्रीनागनाथ त्याच्याजवळ आले व त्यांनी त्याच्यापाशी भाकर व पाणी मागितले.त्यावेळी तिमण्णापाशी देण्यास कांहीच नव्हते.त्याने घरी जाऊन आईकडून भाकरी जमल्यास आणण्याचे वचन दिले.व त्याच्या मातेलाही हा वृतांत ऐकल्यावर आनंद झाला व तिने आपल्या मुलाला ‘ खरोखर भाग्यवान ‘ असे संबोधिले.त्याने त्वरेने येऊन भाकर व पाणी श्रीनागनाथांना दिले व त्यांनी त्याच्या त्या अन्नाचा अतिशय आनंदाने स्विकार केला व त्याच्या भक्तीवर ते ख-या अर्थाने प्रसन्न झाले. तिमण्णाला राज्य प्राप्त होईल असा श्रीनागनाथांनी आशीर्वाद दिला व त्याला सात वेळा लंगराने (नांगराने) मारले व श्रीनागनाथांच्या आशीर्वादाने त्याला पुढे खरोखर राज्यपद प्राप्त झाले. येथे तिमण्णाचा पोशाख विशेष नमूद करण्याजोगा आहे.श्रीनागनाथांची कृपा झाली तेंव्हा त्याने अंगात चोळणा घातलेला होता.(चोळणा म्हणजे गुडघ्याखाली पोहचणारी पण तळपायापर्यंत न पोहोचणारी चड्डी.) तिमण्णाची आठवण सर्व नागनाथ भक्तांना कायम रहावी म्हणून श्रीनागनाथांच्या उत्सवात ज्यांच्या अंगात संचार होतो त्यांना चोळणा घालतात, व त्यानंतर श्रीनागनाथ त्यांच्या शरीरात संचार करतात हा प्रदीर्घ अनुभव वर्षानुवर्षे पुजा-यांना येत आहे म्हणून चोळणा हे आदर्श भक्ताच्या पोषाखाचे प्रतीक होय असेही मानण्यात येते.