श्री शेख नसरूददीन बादशहा
श्रीनागनाथ व श्रीहेग्रसदोघेजण दिल्लीत येऊन पोहोचले.श्रीनागनाथ दिल्लीला एका मशिदीत गेले व त्यांनी आपल्या लाकडी खड्गाच्या आधारे त्या मशिदीतील एकेक खांब पाडण्यास सुरूवात केली.त्यावेळी शेख नसरूद्दीन त्या मशिदीमध्ये नमाज पाडण्यास आला होता. एकेक खांब पडताना पाहून ही मशिद पडणार असे समजून तो मशिदीच्या बाहेर पळून गेला व दुरून मशिदीकडे पाहू लागला तेंव्हा त्याला असे दिसले की, मशिद पूर्वीज्या स्थितीत होती त्या स्थितीतच आहे. म्हणजे मशिद जराही मोडकळीस आली नाही.नंतर नसरूद्दीन बादशहा मशिदीत परत आल्यावर तो श्रीनागनाथांच्या पाया पडला.श्रीनागनाथांच्या इरूपात त्याला पैंगबराचे दर्शन झाले. येथून पुढे श्रीनागनाथ व हेग्रसांचा संचार सुरू झाला.


शेख नसरूद्दीन बादशाह व श्रीनागेश (एकच की भिन्न) : हा वाद कांही विद्वानांनी उपस्थित केलेला दिसतो.म्हणजे श्रीनागनाथ उर्फ श्रीनागेश व नसरूद्दीन यांचे तादृप्य (Indentity) मानण्याचा प्रयत्न कांही विद्वानांनी केलेला आहे.हा वाद साधारणपणे गेल्या कांही वर्षात उपस्थित झालेला आहे असा कोणत्याही सहृदय वाचकाच्या लक्षात येईल. याविषयी येथे चार शब्द लिहिणे क्रमप्राप्त आहे.नागेश सांप्रदायिकांच्या मते श्रीनागनाथ उर्फ श्रीनागेश म्हणजे नसरूद्दीन नसावेत.म्हणजेच या दोन व्यक्ती वेगवेगळया नसून ती एकच आहे असे मानण्यास सबळ पुरावा नाही. याबाबतीतखालीलप्रमाणे विचार करणे ( युक्तिवाद करणे ) शक्य आहे.
1) श्रीनागेशांचा उर्फ नागनाथांचा एकंदर शिष्य-संप्रदाय जो आहे तो विशेष करून दक्षिण हिंदुस्थानात प्रामुख्याने पाहायला मिळतो. याबाबतीत नागेश सांप्रदाय पृष्ठ 25 (डॉ.यू.म. पठाण लिखित) वाचण्याजोगे आहे.येथे असलेल्या शिष्यांच्या शाखेमध्ये नसरूद्दीनची शिष्य शाखा म्हणून असा उल्लेख आढळत नाही.
2) श्री. बा.सी. बेंद्रे यांनी ऐतिहासिक संशोधन करून एक अत्यंत महत्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे, तो म्हणजे शेख नसरूद्दीन हा उत्तर हिंदुस्थानात होऊन गेला व तो दक्षिण (भारतात) हिंदुस्थानात केव्हाच आला नाही. (तुकाराम महाराजांची गुरु परंपरा, बा. सी. बेंद्रे पा.नं. 68) प्रस्तुत संदर्भात हा पुरावा वाचनीय व निर्णायक ठरेल. श्री बेंद्रे यांनी या संदर्भात असा अभिप्राय दिला आहे की, श्रीनागनाथ व नसरुद्दीन यांचे ऐक्य हे केवळ दंतकथेवर आधारलेले आहे व त्यात कोणतेही ऐतिहासिक सत्य समाविष्ट झालेले नाही. (तुकाराम महाराजांची गुरु परंपरा, बा. सी. बेंद्रे पा.नं. 68)
3) नसरूद्दीन आणि नागनाथ यांचे तादृप्य मानावयाचे झाले तर असा एक प्रश्न उपस्थित करता येईल की, श्रीनागनाथांना जो शिष्य सांप्रदाय दक्षिण व उत्तर हिंदुस्थानात प्राप्त झाला तसाच शिष्य परिवार शेख नसरूद्दीन यांना दोन्ही ठिकाणी प्राप्त झाला काय ?या प्रश्नांचे समाधानकारक उत्तर तादृप्य मानणा-या अभ्यासकांना द्यावे लागेल.
4) श्रीनागनाथांनी जे अद्भूत चमत्कार केले.
अ) लाकडाच्या घोडयावर आरुढ होऊन त्याला मानस सरोवरावर पाणी पाजणे.
ब) मानूर येथे वरदम्मा नामे स्त्रीचे पुरुषात रूपांतर.
क) मोहोळ येथे स्वर्गातून पितर उतरविणे.
ड) वडवाळ येथे बहिरंभट ब्राम्हणास कुटून पुन:जिवंत करणे. हे सर्व चमत्कार शेख नसरूद्दीनच्या नावावर नोंदविले गेले असल्याचा सबळ निर्णायक पुरावा समोर येऊ शकेल काय?
5) श्रीनागनाथांचे वर्णन सर्वव्यापी, सर्वज्ञानी असे जे केले आहे किंवा केले जाते तसेच जर वर्णन शेख नसरूद्दीनचे असले तर त्याने सुद्धा केलेले चमत्कार श्रीनागेशांच्या चमत्काराशी सर्व प्रमाणात जुळले पाहिजेत, असा अंतर्गत पुरावा जर उपलब्ध होत नसेल तर दोघांचे तादृप्य मानणेम्हणजेऐतिहासिक मूल्यांची व तत्त्वज्ञानाची अवहेलना करणारे ठरेल.
6) ‘ नागेशलीलामृत ‘ नावाचा ग्रंथ भानजी त्र्यंबक देशपांडे यांनी सुमारे 150 वर्षापूर्वी लिहिलेला आहे. त्यांनी आपल्या ग्रंथात श्रीनागनाथ व नसरूद्दीन यांचे तादृप्य मानणाज्या ओवी त्यांनी स्वत: लिहिलेल्या दिसतात.
तैसे आपुलाले स्वधर्म ।वेगळे असतील उत्तम ।
परि एकचि ठायी विराम ।ऐसे निजरूपी दाविले ॥79॥
हिंदु म्हणती नागेश जाण ।तोचि यवनांशी नसरूद्दीन ।
म्हणती गयबी पै अभिधान ।येरु ते भुजंग बोलती ॥80॥
(तु.म.गु.परंपरा – पा.नं. 49)
परंतु ह्या पंक्ती नसरूद्दीन व श्रीनागनाथ यांचे ऐक्य व तादृप्य सिद्ध करण्यास असमर्थ आहेत, कारण ह्या पंक्ती लिहिणारी व्यक्ती अगदी अलिकडील आहे त्यामुळे त्यांच्या ग्रंथ लेखनावर जास्त भर देता येणार नाही.
नागेशलीलामृत या ग्रंथाच्या लेखकाने वरील पंक्ती लिहितांना कांही ऐतिहासिक पुरावा दिला असता तर त्याचा विचार करणे क्रमपाप्त झाले असते. शिवाय श्रीनागनाथ आणि श्री अज्ञानसिद्ध यांच्या शिष्यांची परंपरा कोठेही सुचवित नाही की श्रीनागनाथ व नसरूद्दीन यांचे ऐक्य किंवा तादृप्य सिद्ध होऊ शकेल.
7) ऐतिहासिक कालगणनेचा पुरावा प्रस्तुत संदर्भात कांही प्रमाणात उपयोगी पडेल असे वाटते.
अज्ञानसिद्धांचा कालखंड शके 1280 ते शके 1350 म्हणजेच इ.स.1358 ते 1428 असून संकटहरणी ग्रंथाचा काल शके 1313 म्हणजेच इ.स. 1391 होय. श्री अज्ञानसिद्ध हे हेग्रसांचे नातू (मुलीचा मुलगा) म्हणजेच स्वत: हेग्रस 2 पिढ्या मागे जातात. ज्या अर्थी श्री अज्ञानसिद्धांना श्रीनागनाथ दिसले नाहीत पण त्यांची कृपा लाभली.त्याअर्थी व श्रीनागनाथ प्रत्यक्ष हेग्रसांच्या वेळेत होते त्याअर्थी हेग्रस व नागनाथ कांही प्रमाणात समकालीन ठरतात. हा युक्तीवाद स्वतंत्र बुद्धीला पटणारा असून हा जर स्विकारला तर श्रीनागनाथ व हेग्रस साधारणपणे 12 व्या 13 व्या शतकाच्या कालखंडात झाले असावेत. प्रसिद्ध मराठी संत श्रीज्ञानेश्वर हे श्रीनागनाथ समकालीन होते हे मत विद्वत्तेच्या जगातात मान्य झालेलेच आहे, असे सारस्वतकारांनी म्हटले आहे. (पा.नं. 244) व याचा उल्लेख डॉ.यू.म. पठाण यांनी नागेश सांप्रदाय पृष्ठ 15 वर केलेला आहे.
8) नसरूद्दीन आणि त्यांचा शिष्य ‘ गेसूदाराज ‘ यांचा कालखंड 14 वे शतक आहे असे त्यांच्या थडग्यावरील वगैरे शिलालेखवरून श्री. वा.सी.बेंद्रे यांनी निष्कर्ष काढलेला आहे.(म. गु. परंपरा पा.नं. 68) वरील चर्चेवरून असे दिसते की श्री नागनाथांचा कालखंड 14 वे शतक आहे असे मानल्यास दोघांचे तादृप्य मानण्यास मोठी अडचण निर्माण होईल असे दिसते.
9) नसरूद्दीन राजा व शेख नसरूद्दीन (संत) अशा दोन व्यक्ती असाव्यात असे वाटते. नागनाथांची भेट नसरूद्दीन राजाशी झाली असावी असे थोडे बहुत अनुमान करणे शक्य आहे.कालगणनेचा विचार करता संत नसरूद्दीन 14 व्या शतकांतील होय त्यामुळे नागनाथ व नसरूद्दीन यांचे एक्य व तादृप्य मानण्यासही सुद्धा एक महत्वाची अडचण आहे. असे वाचकांच्या सहज लक्षात येईल.
10) शेख नसरूद्दीन हा इ.स. 1356 मध्ये पैगंबरवासी झाला म्हणजे मुस्लीम पंथाप्रमाणे त्यांचे थडगे दिल्लीत आहे, असे श्री.वा. सी.बेंद्रे यांनी पृष्ठ 86 वर (तु.म. गुरु परंपरा) नमूद केलेले आहे.परंतु श्री नागनाथ मात्र अदृश्य झाले असे या सांप्रदायात मानले जाते.शिवाय नसरूद्दीनच्या थडग्यावर नागनाथ नसरूद्दीन असे लिहिलेले दिसत नाही.हा शिलालेखचा पुरावासुद्धा दोघांचे ऐक्य मानण्यास पोहचत नाही.
11) एखाद्या गोष्टीच्या बाबतीत परंपरा हा सुद्धा एक निर्णायक पुरावा मानला जातो. परंपरेला एक वेगळे बलस्थान प्राप्त झालेले असते.दक्षिण हिंदुस्थानात जेथे जेथे नागनाथ संप्रदायाचे लोक नागनाथ-नसरूद्दीन या दोघांचा उत्सव एकत्र साजरा करताना दिसत नाहीत.हा परंपरेचा पुरावा दोघांचे ऐक्य मानण्याच्या बाबतीत विरुद्ध जाणारा आहे, असे स्पष्ट लक्षात येते.
12) येथे आणखी एक अभवात्मक पुरावा सादर करणे शक्य आहे तो म्हणजे श्री अज्ञानसिद्ध आपल्या ग्रंथात श्रीनागनाथांचा उल्लेख शंकर किंवा शंकराचा अवतार म्हणून करतात, परंतु हा पैगंबराचा अवतार आहे असे कोठेही उल्लेखित नाहीत. श्रीअज्ञानसिद्धांचा हा अभावात्मक पुरावासुद्धा प्रस्तुत संदर्भात अत्यंत महत्वाचा असून केवळ यावरूनही श्री नागनाथ व नसरूद्दीन एक नव्हेत असे ठामपणे म्हणण्यास दुजोरा मिळतो.
उदा :-
परम भाग्य माझे ।जेणे फिटेल भ्रांती ओझे ।
स्मरण लागो तुझे । शिव शंभो देवा ॥
(श्री अज्ञानसिद्ध)
मंगलमूर्ती मंगल वदन त्रिनयना
करुणा सिंधु देवा जिंतियले मदना ।
भक्त जयजयकारा जय उमारमणा
तुजविण मी अनाथ तू अधार या प्राणा ॥
(श्री अज्ञानसिद्धकृत आरती)
तसेच
हे संकटहरणी समर्थ ।जो पठण करील भावनायुक्त ।
तया इच्छिले फळ देत ।उदार हस्ते दानशूर ॥
दृढ करावे श्रवण मनन ।निकट निधीध्यासन ।
तात्काळ संकटरण।गौरी रमण स्वये करी ॥
(अज्ञानसिद्धकृत संकटहरणी ग्रंथ)
याशिवाय श्री अज्ञानसिद्धांनी रचलेला ‘ नागेशमाहात्म्य ‘ नामक स्वतंत्र ग्रंथात संपूर्ण ‘ महाशिवरात्रीचा महिमा ‘ वर्णिलेला आहे.शंभो, त्रिनयन, उमारमण, गौरीरमण ही नांवे फक्त शंकरालाच लागू पडतात हे सर्वविदीतच आहे.