श्री हेग्रस

सोलापूर जिल्ह्यात मोहोळ या गावाला पूर्वी चंद्रमौळी या नावाने संबोधित असत.या गावामध्ये सुमती नावाची एक संस्कारक्षम ब्राह्मण स्त्री रहात होती.तिचे गोत्र भारद्वाज होते. तिला हेग्रस नावाचा सुपुत्र झाला.आपल्या पुत्राच्या हातून कांहीतरी अलौकिक घडावे व ह्या नर जन्मामध्ये नराचा नारायण कसा होईल या विषयीचे योग्य संस्कार ही माता आपल्या पुत्रावर वारंवार करीत असे. ह्यासंस्कारांचा हेग्रसाच्या बालमनावर चांगलाच परिणाम झाला. पुढे त्यांचा व्रतबंध व वेदाध्ययन झाल्यावर एके दिवशी आपल्या वंदनीय मातेचा निरोप घेऊन घोर तपश्चर्या करण्यासाठी हा हेग्रस घरातून बाहेर पडला व त्याने तपश्चर्येसाठी योग्य अशा वनाचा आश्रय घेतला. त्या वनात त्याने 12 वर्षेपर्यंत गोमातेची सेवा केली.गोमातेला चांगल्या पाण्याने स्नान घालणे, तिला योग्य ते गवत घालणे.तसेच रोज सकाळी व सायंकाळी गोमातेची नित्यपूजा करणे अशी सेवा ते करीत असत.त्याचबरोबर वनामध्ये सहज उपलब्ध होणारी कंदमुळे, दूध इत्यादींचे प्राशन हेग्रसांनी केले. या संबंधात एक नमूद केले पाहिजे की, कांही अलौकिक गोष्टी प्राप्त करण्यासाठी गो सेवेचे व्रत हे कंकण म्हणून बांधत असत.
12 वर्षांची प्रदीर्घ तपश्चर्या केल्यावर बाळ हेग्रस चंद्रमौळी ह्या ठिकाणी परत आला व तो आलेला पाहून त्याच्या मातेला स्वर्ग सात बोटे राहिला.तिने बाळ हेग्रसाचे केस विंचरले. केसांचा गुंता सोडवितांना बाळाचे कांही केस तुटले याच्या वेदना त्याला असह्य झाल्यावर हेग्रसाच्या मनाचे सांत्वन करतांना ती सुमाता म्हणाली की, ” पृथ्वी मातेची तृण (केस) उपटताना (तोडताना) तिला किती वेदना झाल्या असतील ह्याचा तू कधी विचार केला का?” मातेच्या ह्या अचूक दृष्टांताने बाळ हेग्रसाचे डोळे खाडकन उघडले.जणू काय त्याच्या डोळयात मातेने अंजन घातले असे त्याच्या मनाला वाटले असावे.ह्या छोट्याशा दृष्टांताने पाप-पुण्याविषयीची त्याची कल्पना खज्या अर्थाने जागृत झाली. त्याला खरोखर असे वाटू लागले की, 12 वर्षे पर्यंत आपण जी तपश्चर्या केली त्याच्यामध्ये पाप कर्माचाच वाटा मोठा आहे व अशामुळे मानवी जीवनाचा पुरुषार्थ (मोक्ष) साधणे आपणाला दुर्लभ होईल ह्याचे त्याच्या मनाला वाईट वाटले. बाल हेग्रसाने सद्गुरुच्या शोधार्थ मातेचा पुन: निरोप घेऊन तीर्थ यांत्राना भेट देऊन अतिशय कठीण अशा अरण्यातून मार्ग काढून शोध घेण्याचा प्रयत्न सुरु केला.
हेग्रसाचे माहूर गडावर आगमन

सद्गुरुंच्या दर्शनाचा ध्यास मनातूनच लागल्यामुळे भ्रमण करता करता बाळ हेग्रस पुढे कांही काळाने माहूर गडावर असलेल्या जगन्माता रेणुका देवीसमोर येऊन उभे राहिले.तिच्या दर्शनाने त्यांचे अंतर्मन आनंदीत तर झालेच व येथेच आपली मनोकामना पूर्ण होईल अशी भावना सुद्धा त्यांची तयार झाली.येथे माहूरला राहून हेग्रसाने गोसेवेप्रमाणेच शक्तीची देवता असलेल्या रेणुका देवीची मोठया प्रमाणात उपासना केली. ह्या सेवेने जरी शरीराला कृशता आली असली तरी आपली मनोकामना ह्या शक्ती देवीच्या उपासनेने पूर्ण होईल असे त्यांना वाटले व आश्चर्याची गोष्ट अशी की 12 वर्षाच्या तपश्चर्येने सुद्धा जगन्माता रेणुका देवी हेग्रसावर खज्या अर्थाने प्रसन्न झाली नाही. देवीची उग्र उपासना (तंत्र शास्त्राला मान्य असलेली ही महाविद्या उपासना होय.) करून सुद्धा जेव्हा इष्ट फलप्राप्ती झाली नाही तेव्हा हेग्रसांनी सद्गुरू प्राप्तीशिवाय तरणोपाय नाही हे मनावर ठसवून अशा प्राप्तीशिवाय आपल्या मातेचे पुन:दर्शन घ्यावयाचे नाही असा मनोनिग्रह केला व आत्मबलिदान करण्याचे त्यांनी ठरविले. मनोभावे पूजा करून यज्ञकुंड पेटविले व देवीची पुन: प्रार्थना करून तिची अप्रसन्नता लक्षात घेऊन, आपल्या शरीराचा एकेक अवयव तोडून त्याची यज्ञात आहुती देण्यास सुरूवात केली. त्यांच्या ह्या आत्मबलिदानाच्या प्रकाराने आता मात्र रेणुका देवी प्रसन्न झालीव रेणुका देवीने ‘ बाळाने योग्य तो वर मागावा ‘असे जेव्हा म्हटले तेव्हां हेग्रसांनी सद्गुरूंच्या प्राप्तीचा वर तिच्यापाशी मागितला तेंव्हा-
तिने दाविले परब्रह्म परिपूर्ण। तो देव नागनाथ ॥
अशा सद्गुरुंच्या प्राप्तीसाठी हेग्रसाने हस्तिनापुरापलीकडे जावे व माध्यान्हाच्या वेळी मानससरोवरावर लाकडी घोड्यावर स्वार होऊन तुझे सद्गुरु जेव्हा खाली उतरतील व घोड्याला पाणी पाजतींल त्यावेळी तू त्यांचे चरण धर. ते तुझ्यावर कृपा करतील व तुझे काम होईल असे सांगितले.
हेग्रस व श्रीनागनाथ यांची भेट

हेग्रस स्वत: तिकडे जाण्यास तयार होईनात व रेणुकामातेनेच त्यांना योग्य ते द्यावे असे सांगितल्यावर तिने योग मायेने हेगरसांना मानससरोवरकाठी नेऊन ठेवले. त्या सद्गुरुच्या डोक्यावर मी पांढरी घार बनून फेज्या मारीन अशी उपयुक्त खूण तिने त्यांना सांगितली.
जो काष्ठाचिये अश्वावरी।बैसोनियासंचार करी ।
चाबूक सर्पाचा घे करी ।रूप असे दिगंबर ।
तयाचे मस्तकावरी फिरेन ।घार होऊन तत्काळ ॥
त्या खुणेनुसार हेग्रसांनी त्यांचे चरण धरले त्यांनी घोडयाला टाच मारून घोडा उडविला व हेग्रसांच्या पाठीवर फटके मारण्यास सुरुवात केली. किती फटके मारले तरी हेग्रस आपले चरण सोडीत नाहीत हे लक्षात आल्यावर नागनाथांना ह्याच्यावर कोणाची तरी कृपा आहे याची जाणीव झाली व त्याच्या डोकयावर असलेली घार बनून देवीच आलेली आहे. असे लक्षात आल्यावर श्रीनागनाथ घोडयावरून खाली उतरले व त्यांनी हेग्रसाला दृढ अलिंगन दिले.या अलिंगनानेच हेग्रसांना सद्गुरुंच्या लाभाचा खराखुरा परमानंद झाला.
मग बोलती नागनाथ ।बारे तू आलासि किमर्थ ।
काय तुझा मनोरथ ।वर्ततसे तो निरोपी ॥
हे ऐकोनी अभयपाणी ।येरू संतोष मानी मनी ।
माझे मस्तकी वरदपाणी ।ठेविजे स्वामी सत्वर ॥
ऐसे ऐकोनी कृपामूर्ती ।करूणा द्रवोनिया चित्ती ।
आलिंगले तया प्रती ।निज भक्तासी तेधवा ॥
तेणे अज्ञान निरसिले ।निजात्मज्ञान प्रकाशले ।
सकळ एकत्व पाहिले ।चराचर निजरूपी ॥
श्रीनागनाथांचे भक्त हेग्रसांनी चरण धरिले व तुम्ही माझा खरा उद्धार केलात व मी ख-या अर्थाने कृतार्थ झालो आहे.माझी आपल्या चरणी एकच विज्ञापना आहे की,’ आपण माझ्या मातेला व माझ्या गावातील लोकांनासुद्धा माझ्या प्रमाणेच कृतार्थ करावे.’यावरून असे दिसते की, बाळ हेग्रसांच्या मनामध्ये बहुजन हिताची व कल्याणाची ओढ लागलेली दिसते. जास्तीत जास्त लोकांचे जास्तीत जास्त कल्याण करणे या प्रकाराला भगवत् गीताकार” लोक संग्रह ” असे म्हणतात. या लोक संग्रहाची भावना त्यांच्या मनामध्ये चांगल्या रितीने प्रज्वलीत झालेली होती असे म्हणणे संयुक्तिक व क्रमप्राप्त ठरते त्यांच्या या भावनेमुळेच श्री नागनाथांना त्यांची दया आली व त्यांनी त्यांच्या पाठोपाठ येण्याचे कबूल केले ते सुद्धा एका अटीवर व ती अट म्हणजे हेग्रसांनी मागे वळून पाहावयाचे नाही, व अशा रितीने शिष्य पुढे आणि गुरू पाठीमागे असा संचार सुरू झाला.
मोहोळ येथे श्रीनागनाथांचे आगमन

देगांवपासून मोहोळ हे अंतर चौदा ते पंधरा मैल आहे.चंद्रमौळी गावालाच मोहोळ असेही म्हटले जाते.वाटेमध्ये एका चिंचेच्या झाडाखाली विश्रांती घेण्यासाठी श्रीनागनाथ थांबले.(हे झाड अद्यापि भक्तांना या गोष्टीची साक्ष देत उभा आहे.)ह्या झाडाला नागचिंच ह्या नावाने ओळखिले जाते.ह्याच मार्गाने ते मोहोळकडे आले.गावाच्या बाहेर येऊन ते थांबले. इकडे आपले गुरू केंव्हा येतील हा ध्यास भक्त हेग्रसांना होताच. सदैव रोज ते आपल्या गुरूंची वाट पाहात व त्यांच्या नामस्मरणात दिवस घालवीत.
हेगरस कुरूठा मोहोळ ग्रामी ।पुत्र योगेंद्रासवे रमे नामी ।
राही सदैव जनकल्याण कामी । वाट पाहे गुरूची ॥
ह्या ठिकाणी हेग्रसांना योगेंद्र नांवाचा मुलगा होता असे दिसते.आपल्या भक्ताची परिक्षा घेण्यासाठी श्री नागनाथांनी शरीर व वेष पालटले व अंमळ (फकीर) वेष धारण करुन मोहोळला आले.
सत् शिष्याची येता आठवण ।निघाले चंद्रमौळीस दयाधन ।
शिष्य भाव पाहण्या कारण ।नागनाथ वेष घेती ॥
निशे:ष अंगवठ पालटले ।फकीर वेषामाजी नटले ।
सत्स्वरुप कैसे दिसले ।तया दयाधन सद्गुरूंचे ॥
सर्वांगात पू भरले आहे, फकीराचा वेष घेतलेले, हातात कटोरा घेतलेले अशा प्रकारचे विचित्र रूप श्री नागनाथांनी घेतले.गावाबाहेरील एका झाडाखाली येऊन कोणाची तरी वाट पाहात आहे असे लोकांना दिसू लागले.कोणीही त्यांच्याजवळ जाईना .ही वार्ता गावात पसरली व हीच वार्ता श्री हेग्रसांच्या कानावर गेली.ते सच्चे भक्त असल्याने त्यांनी अंतर्ज्ञानाने ओळखिले की, ते नक्की आपले गुरूच आहेत. वार्ता समजताच स्वत:च्या घरातूनच त्यांच्याकडे लोटांगण घालीतच निघाले.
हेगरस ऐकता वर्तमान । गुरू स्मरणात मन उन्मन ।
तया खेवि घालीत लोटांगण । संकाशी दृष्टी सायुज्यले ॥
लोटांगण घालीत त्या फकीरापाशी गेले व त्यांना पाहताच हेच आपले गुरू होत.आपली परीक्षा पाहण्यासाठी ह्यांनी शरीर (काया) पालट केला आहे.ताबडतोब कांही विलंब न लावता त्यांचे चरणदर्शन घेतले.
श्रीनागनाथ व भक्त हेग्रस यांची चंद्रमौळी येथे भेट
नागनाथ संतोषिले मानसी ।आलिंगले हेगरस शिष्यासी।
गुरू शिष्य पातले सुखरासी । धन्य तो हगरस ॥
हृदया हृदय एक जहाले । तेणे द्वैत भान उडाले ।
सकळ एकत्व पाहिले । भक्तराजे ते समयी ॥
दोघांनी अत्यानंदाने त्या जवळ असलेल्या कटोज्यातील अन्न भक्षण करण्यास सुरूवात केली.हे दोघेजण मिळून अन्न भक्षण करीत आहेत हे पाहून आपल्या गावातील हा ब्राम्हण भ्रष्ट झाला आहे अशी लोकांनी चर्चा करण्यास सुरूवात केली.लोकांची यत्किंचितही पर्वा न करत श्री गुरू दर्शनाचा अलौकिक अत्यानंदाचा क्षण ते चाखीत होते. नंतर श्री नागनाथ (ते फकीर) व भक्त हेग्रस हे दोघेजण श्रीहेग्रसांच्या घरी जाण्यासाठी निघाले.घरी गेल्यावर श्रीनागनाथांची त्यांनी षोडशोपचारे पूजा केली.तेथे ते अत्यानंदाने राहू लागले.श्री भक्त हेग्रसांना व त्यांच्या घरातील कुटुंबीयांना स्वर्गसुखसुद्धा फिके वाटू लागले.कैलासाचा राणा प्रत्यक्षात त्यांच्या घरी त्यांच्या बरोबर राहू लागला होता.
इकडे आपल्या गावातील वेद-शास्त्रसंपन्न अशा हेग्रस ब्राह्मणाने फकीरासमवेत भोजन केल्याने गावातील ब्राह्मणांनी व इतर लोकांनी त्यांना वाळीत टाकलेव त्याची खूण म्हणून त्यांच्या घरावर हाड रोवले.त्यानंतर असा कांही काळ गेला.
अक्षय्य तृतीयेचा चमत्कार
पुढे कांही दिवसांनी अक्षय्य तृतीयेचा दिवस जवळ आला.त्या दिवशी पूर्वी मृत झालेल्या घरातील लोकांना (पितरांना) जेवण दिले जाते.थोडक्यात श्राद्ध कर्म केले जाते.हे कर्म चालविण्यासाठी ब्राह्मणांना बोलविण्याची पद्धत आहेव वेदमंत्राद्वारे हा विधी केला जातो.ह्या कार्यासाठी ब्राह्मण लोकांना बोलविण्यासाठी हेग्रस गावातील ब्राह्मणांकडे आमंत्रण देण्यासाठी गेले.सर्व ब्राह्मणांनी आमंत्रण नाकारले व तुमच्या घरी कार्य करणे हे धर्मास सोडून आहे असे उद्गार काढले. हे सर्व ऐकून उद्विग्न मनानेहेग्रसघरी परतले व दु:खित होऊन बसले. त्यांना त्या अवस्थेत बसलेले पाहून श्रीनागनाथांनी विचारले त्यावेळी श्रीहेग्रसांनी झालेला वृतांत सांगितला.
द्विज न येती पितृकार्यास । म्हणवुनी व्यथा ही मनास ।
द्विजे बहिष्कृतिले आम्हास । पितृकार्य कैसे करावे ॥
त्यावेळी श्री नागनाथांनी उत्तर दिले.
दयाघने आज्ञा शिष्यास । चिंता केवि करितोस ।
पितरच येतील कार्यास । नाभिकास लडिकाळा ॥
तुम्ही श्राद्धकर्माची तयारी करा.अन्न शिजवून जेवण तयार करा.सर्व तयारी झाल्यावर मला सांगा अशी आज्ञा हेग्रस पुत्रास श्रीनागनाथांनी केली.
हेचि आज्ञा पितापुत्रास । पाकसिद्धी करिता सुरस ।
आज्ञा करिती पुरंदरास । श्री दयाघन नागनाथ ॥
अन्न तयार झाल्यावर श्रीनागनाथांना सांगितले व नंतर त्यांनी इंद्र देवास आज्ञा केली की ‘ ह्या गावातील जे पितर असतील त्या सर्वांना खाली पाठवावे.’ घराची सगळी दारे बंद करावयास सांगितले व स्वत:ची दृष्टी आकाशाकडे लावली. तोच आपापल्या विमानात बसून (वरून खाली येण्यासाठी असलेले साधन) पितरलोक त्या वाड्यात उतरले.त्यांना श्रीनागनाथांनी श्राद्ध कर्म सुरु करण्यास सांगितले. श्राद्धकर्मासाठी वेद पठणांचा आवाज सर्वत्र घुमू लागला.तो आवाज ऐकूनगावांतील ब्राह्मण वर्ग व इतर ग्रामस्थ आश्चर्य करू लागले की ह्यांचे घरी आपण तर कोणी गेलो नाही तर घरांत वेदमंत्राचा आवाज कसा?हेग्रसांनी फसवून बाहेर गांवातील ब्राह्मण नक्कीच आणले असणार. पाहू या तर, म्हणून दार उघडण्यासाठी आवाज केला.तरी दार उघडले गेले नाही.त्या घराच्या खिडक्या उंच होत्या.त्यातून डोकावून पाहण्यासाठी शिडया आणून त्यावर चढून आत डोकावून पाहू लागले तर त्यांना वेगळाच अनुभव आला.पाहणाज्याचे पूर्वी मेलेले लोक म्हणजे पितर हे आत आहेत आणि ते सर्वजण जोराने मंत्रोच्चार करतात हे पाहून त्यांना आश्चर्य वाटले.हे कसे काय?तेथे जमणाज्या सर्वांची हीच खात्रीझाली.खात्री पटल्यावर त्यांना खरा प्रकार कळला, तेंव्हा त्यांना हेग्रसांची थोरवी कळाली.’आम्ही पश्चातापले आहोत तर कृपा करून आम्हाला आत घ्या.त्यासाठी दार उघडा ‘ म्हणून ग्रामस्थ विनवू लागले.श्रीनागनाथांनी दार उघडण्यास नकार दिला.आतील पितर लोकांची जेवणे झाली.त्यांचे उच्छिष्ट बाहेर फेकल.हा आपल्या पितरांचा प्रसाद म्हणून बाहेरील लोकांनी ते उच्छिष्ट खाल्ले व चाटले.शेवटी बाहेरील लोकांच्या विनंतीनुसार दार उघडले तेव्हा ते लोक आत आले. त्यांनी
निंदक बमन देखन आये । देखत बडोंका दर्शन हुए ।
शर्माके हात जुडाये । स्वामी हेगरस को नमन किये ।
बोलत बात बोलत रहे । पाप अभिमानसे हमे डुबाये ।
अशी कबूली दिली.नंतर हे पितर प्रत्येकाच्या घरी नेण्याची परवानगी मागितली.श्रीनागनाथांनी परवानगी दिली.फक्त एक रात्र घरी राहतील व दुसज्या दिवशी आपापलया ठिकाणी जातील असे सांगितले.त्याप्रमाणे घड

दिन एक मिल रहे । दिन दुसरे गैब भये।
ह्या प्रकारानंतर गावातील व गावाबाहेरील बरेच लोक श्रीनागनाथांचे शिष्य बनले.नित्य नेमाने त्यांची सेवा करू लागले.ह्या घटने नंतरही गावातील काही लोक निंदास्तुती करू लागले.याचे प्रमाण वाढले शेवटी ह्या निंदेस कंटाळून ह्या गावास शापवाणी उच्चारून श्रीनागनाथ गाव सोडते झाले.
हे जन नसे विश्वासी । स्थलांतर असे हे मानसी ।
म्हणुवुनी निघे निकुंजेसी । चंद्रमौळी त्यजुनिया ।

श्रीनागनाथांचा मोहोळ गांवास शापवाणी देऊन मोहोळ गावाचा त्याग
श्रीनागनाथ चैत्र महिन्यातल्या कृष्ण पक्षातल्या चतुर्थीच्या रात्री मोहोळ (चंद्रमौळी) सोडून गावाबाहेर आले.तेथून ते ‘ हे निंदक गांव आहे येथे राहणे नको म्हणून व दुसरीकडे राहू ‘ यासाठी रात्रीच पळत निघाले त्यांच्या बरोबर बराचसा शिष्यपरिवार व हेग्रस हेही निघाले. हे सर्व जण पळत आडरानातून निघाले.वाटेत एक चिंचेचे झाड होते त्या खाली थोडसे थांबून मागे वळून पाहिले तर चंद्रमौळी गांव दिसत होते.गांव दिसते आहे तर अजून पुढे चला म्हणून पुढे पळत निघाले.रानात गेल्यावर मागे वळून पाहिले आता येथून गाव दिसत नाही तर येथे थांबू असे म्हणूनतेथे विसावले.
श्रीनागनाथ ज्या ठिकाणी विसावले तिथे एक वाळलेल्या वडाच्या झाडाची फांदी पडलेली होती.श्रीनागनाथांनी त्या झाडाच्या फांदीला उभा करुन शिष्यवर्गाला पाणी घालण्यास सांगितले.शिष्यांनी त्या फांदीला पाणी घालताच तीला पालवी फुटली.

श्री गुरु शिष्य वटतली बैसला | पालवी अंकुर फुटली तयाला |
तोचि विशाल वटवृक्ष बनला | अद्यापि साक्ष देतसे ||
ह्या झाडाखाली राहू लागले.त्यांच्या बरोबर बराचसा शिष्य परिवार रहात होता.वाळलेल्या वडाच्याझाडाखाली रहात होते.म्हणून वडवाळ हे नामाभिमान पडले.
विशाल सुंदर विटंक सावली | तया लागी रमली गुरु मावुली |
तै वडवाळ नगरी उदयेली| वडवाळसिध्द नागनाथ ||
भक्त हेग्रसांसाठी गोपाळ कृष्णाचे मंदिर आणले –
भक्त हेग्रस हे श्रीनागनाथांच्या सेवेस तत्पर असत.त्यांच्या सेवेत त्यांनी कधीही खंड पडू दिला नाही.सेवा करत असतांना रोज ते नेहमीप्रमाणे आपल्या कुलदैवताच्या दर्शनासाठी म्हणून पंढरपूर येथील गोपाळपुरास जात असत.एके दिवशी श्री नागनाथांनी हेग्रसासविचारले, ‘ रोज तू कुठे जातो?’त्यांचे उत्तर ऐकल्यावर म्हणाले ‘ ह्यामुळे तुला श्रम होतात तर आपण त्या गोपाळपुरातील श्रीकृष्णास इकडेच आणु.’म्हणून रात्रीतून गोपाळपुरातील श्रीकृष्णास इकडेच आणु.’म्हणून रात्रीतून गोपाळपुरातील त्या गोपाळकृष्णांचे मंदिरच गोपाळकृष्णांच्या मूर्तीसह अलगद उचलून आणून वडवाळ येथे ठेविले.
हेगरस ब्राह्मण लागून । होता श्रम दारूण ।
आणिलेसि तू बां गोपाळकृष्ण । पंढरीहूनी नागेशा ॥
आणि तू आता येथेच दर्शन घेत जा म्हणून सांगितले.अशाप्रकारे भक्त हेग्रसांचे श्रम त्यांनी वाचविले.(ते मंदिर अद्यापि वडवाळ येथे उभे आहे.त्यातील श्री गोपाळकृष्णाची मूर्ती ही प्राचीन असून भव्य अशी उभ्या अवस्थेत आहे.)ही मूर्ती उत्तम शिल्पाचे प्रतीक आहे.ह्या मंदिरास पाया नाही. ज्ञात व अज्ञात असे अनेक शिष्य गण श्री नागनाथांच्या सेवेस वडवाळ येथे येऊ लागले.कांही जण तेथेच राहू लागले व जवळपासचे लोक नित्यनेमाने येऊ लागले.अशा प्रकारे ह्या वडवाळ गावास तीर्थ क्षेत्राचे रुप प्राप्त झाले. पुढे मोहोळवरून नित्य नियमाने येणाज्या भक्तजनांना श्री नागनाथ म्हणाले तुम्ही इकडे येण्यास श्रम घेऊ नका. विशिष्ठ ठिकाणी माझे स्थान करा व खर्गतीर्थ करा, यावत् चंद्र दिवाकर पृथ्वीतलावर तळपतात तावत् मी वैशाख शुध्द तृतीया( अक्षय तृतीया ) व सप्तमीस तेथे वायु रुपाने येईन व ह्या हेग्रसभक्तास व पुढे त्याच्या वंशास वायुरुपाने भेट देईन. त्याच बरोबर ख-या भक्तांचा उध्दारही होईल.
गुरु नागनाथ हरिखले | हेगरसास वर दिधले |
ऐका श्रोते सज्जन भले | वाणी नागनाथाची ||
यावत् चंद्र दिवाकर | तावत् असे सत्य वर |
वायु रुपात भेट देणार | सत्य सत्य त्रिवार ||
या ठिकाणी असे दिसते की, वरील त्यांच्या सांगण्यावरुन त्यांनी आपले अवतार कार्य संपविण्याचे ठरविलेले दिसते आणि हेच चाणाक्षपणे भक्त हेग्रसानेजाणले व त्यांनी आता ह्या आपल्या गुरुंना कोणती गुरुदक्षिणा द्यावी ? जेणे करुन त्यांना बरे वाटेल याचा बराच विचार केला व
हेगरस कृतार्थी बनला | अनुताप वाटे मनाला |
सद्गदीत कंठ झाला | पुण्यशील पुण्यवान ||
शेवटी त्यांनी ठरविले की ,
काय द्यावी गुरुदक्षिणा | प्रश्न मनी पुन: पुन: |
कायाच द्यावी गुरुदक्षिणा | तेणे होईल सार्थक ||
असा मनी विचार येताच
नागनाथ पदी शिर | अर्पण्या नाही उशीर |
ही दक्षिणा असे थोर | पुण्य श्लोक हेगरस ||
आपले शिर छेदून त्यांच्या चरणी अर्पण केले.
भक्त हेगरस पुर्व मुख उभा राहून | हातीचे दिव्य खड्ग घेवून |
आपले शिरकमळ उतरुन | देवे ओवाळिले |
देवे दिधले लोहाचे चणे | तेणे स्विकारिले |
तेणे जन्मोजन्मीचे फिटले पारणे | तो देव नागनाथ ||
( श्री अज्ञानसिध्द )
आपल्या अत्यंत लाडक्या अशा भक्ताने अवतार संपविला तर आपलेही अवतार कार्य संपले असे म्हणून तेथील सर्व लोकांचा निरोप घेवून वडवाळ येथे खर्गतीर्थात श्रीनागनाथ गुप्त झाले.
नागनाथ इतुके बोलून | खर्गतीर्थी स्वये प्रवेशुन |
गुप्तचि जाहले भगवान | जय जय श्री नागनाथा ||
त्यांच्या वराप्रमाणे श्री क्षेत्र वडवाळ व मोहोळ येथे उत्सव सुरु झाला.भेटीचा सोहळा सुरुझाला.पुढेअज्ञानसिध्दांनी आपल्या ‘धन्य ते वडवाळ’ या अभंगात वडवाळ क्षेत्राचे महनीय वर्णन केले आहे.श्रीनागनाथांच्या पदस्पर्शाने ह्या वडवाळ क्षेत्रातील प्रत्येक गोष्ट पवित्र बनली आहे.अशा ठिकाणच्या उत्सवास बाहेरील लोक येत असतात.
त्रैलोक्याचे जन | येती वडवाळासी ||
पाहावया गणासी | प्रभू नागेशाचे ||
यावरून दोन्ही ठिकाणचा उत्सव अज्ञानसिध्दांच्या आधीपासून चालू आहे हे स्पष्ट होते. नागनाथ व हेग्रस यांनी अवतार कार्य संपवले.आता एवढेच म्हणावे वाटते की,
कैसी करावी नागनाथ स्तुती | वर्णिता खुंटली श्रुती स्मृती |
तेथे मानवाची कैसी गती | शब्दचि नसे वर्णिया ||