श्री भिकलिंग

मोहोळ येथे श्रीनागनाथांच्या वास्तव्यात त्यांचा भक्त भिकाजी नावाचा माळ्याचा मुलगा होता.त्याचे वय साधारणपणे सात – आठ वर्षाचे होते.त्याला लहाणपणापासून शिवाचे वेड होते.म्हणून लंपडावादि खेळ खेळण्याबरोबर त्याला मातीचे शिवलिंग बनविण्याचा छंद जडला होता. म्हणून तो रोज सकाळी ओढ्याकाठी जावून मातीचे एक शिवलिंग तयार करीत असे व त्यावर उपलब्ध असलेली पुष्प अर्पण करीत असे आपल्या सवंगड्याबरोबरच आपल्या आईवडिलांनाही तो नमस्कार करण्यास सांगत असे. हा त्याचा छंद नित्य घडत असल्याने त्याच्या हातून रोज शिवाची जणू पार्थिव पूजाच घडत असे.गावातील इतर लोकांना त्याचा हा छंद माहित होता म्हणून शिंवलिंग बनविणारा भिकाजी म्हणून लोक त्याला “भिकलिंग” म्हणू लागले.एकदा ते लपंडावाचा खेळ खेळत होते. त्यावेळी लपण्याची वेळ त्या भिकलिंग ह्या मुलावर आली त्यावेळी त्याने श्रीनागनाथांना विचारले, ‘मीकुठे लपू?म्हणजे माझे मित्र मला हुडकू शकणार नाहीत.’त्याच्या बोलण्याचा भावार्थ लक्षात घेता श्रीनागनाथांनी त्याला वाळूत पुरून बसवले.’आता तुला तुझे मित्र हुडकू शकणार नाहीत’ असे सांगितले.त्याप्रमाणे तो अगदी निश्चिंतपणे त्यांचे स्मरण करीत वाळूत बसून राहिला.खेळ संपल्यावर श्रीनागनाथांनी भिकलिंगास वर येण्यास सांगितले त्यावेळी त्या महत् भाग्यवान भिकलिंगाने उत्तर दिले की, ‘ देवा तु मला येथे निश्चिंतपणे बसण्यास सांगितलेस. मी तुझी सेवा करीत बसलो आहे आता मला पुन: वर का बोलावता ?’ हे ऐकून श्रीनागनाथ संतोष पावले व त्यांनी त्यास वर दिला’मी उत्सवात वैशाख शुध्द षष्ठीस तुझ्या भेटीस निरंतर येईन.’ अशा प्रकारे श्री नागनाथांनी भिकलिंगाचा उध्दार केला.हा भेटीचा सोहळा आज पावेतो चालू आहे.धन्य तो भिकलिंग.हा भेटीचा सोहळा भाग्यवंतांना पहावयास मिळतो हे खरे. येथे नमूद करावेसे वाटते की, नागेश लीलामृतकार यांनी हा प्रसंग अगदी अलीकडील आहे असे वर्णिलेला आहे परंतु श्रीनागनाथांचा अवतार कार्य संपल्यानंतर श्रीनागनाथांनी असा भेटीला येण्याचा वर कोणालाही दिलेला नाही. तसा कार्यभाग उत्सवात ही नाही.उत्सवात जो कार्यक्रम आहे तो अनादी कालापासून अत्यंत भावनेने विनाखंडीत चालू आहे.त्यात नवीन कोणी कांही अधिक चालविले नाही.नवीन चालवू म्हंटले तर ते टिकत नाही.असा सर्वांना प्रत्यंतर म्हणजेच अनुभव आहे. ज्या अर्थी श्रीनागेशाची पालखी नेण्याचा कार्यक्रम आहे, या वरून श्रीनागनाथांच्या एकंदरीत चरित्रावरुन असे दिसते की, श्रीनागनाथांना भक्ताच्या भेटीस जाणे अत्यंत आवडते. त्याअर्थी हा भिकलिंगाचा सोहळा पूर्वापार चालत आलेला आहे हे त्रिवार सत्य आहे. श्रीनागनाथ हे भेटीसाठी जाणे ही साधी गोष्ट नव्हे.जसे हेग्रस व अज्ञानसिध्द पुण्यवान होते तितकेच भिकलिंगही पुण्यवान होत. एकंदरीत असे विशेषत्वे करुन म्हणावयाचे आहे की,भिकलिंगाचा काळ नागनाथांच्या वेळेपासूनचा आहे.हे श्रीनागेश भक्तांनी अभ्यासून पाहावे.आता पर्यंत ज्यांची श्रीनागनाथांच्या वरील चरीत्रे उपलब्ध आहेत त्यात सर्वानीच सर्व घटना उल्लेखिलेल्या आहेत असे नाही.म्हणून एखादी घटना घडलेलीच नाही असे म्हणता येणार नाही असे म्हणावेसे वाटते.तरी भिकलिंगाच्या भेटीचा सोहळा प्रत्येक भाविकांनी लक्षात घेवून त्यांचा काळ हा योग्य आहे की नाही हे सुज्ञपणे लक्षात घ्यावे ही विनंती.