महागाव

हे स्थान गुलबर्गा जिल्ह्यात गुलबर्गा-बिदर रोडवर गुलबर्गा पासून 28 कि.मी. अंतरावर आहे. येथे श्री नागनाथांचे प्राचीन मंदिर आहे. श्री अज्ञान सिद्धयांचे शिष्य श्री देवंजय येथे राहात होते.त्यांनी आपल्या उपासनेसाठी श्री नागनाथांचे मंदिर स्थापन केले. हे अति प्राचीन व अति भव्य मंदिर आहे. या ठिकाणी दैनंदिन पूजा-अर्चा चालविण्यासाठी हिंदू तथा मुस्लीम राजानी हजारो एकर जमीन दान दिलेली होती. सन 1954 पर्यंत या मंदिराचे नांवाने 3000 एकर जमीन होती. यावरून या स्थानाचे महत्व लक्षांत येईल. या ठिकाणी दरवर्षी आषाढ शुद्ध एकादशीस उत्सव साजरा होतो. त्यास गुलबर्गा, बिदर, विजापूर, सोलापूरइ. जिल्ह्यातील लोक बहुसंख्येने हजर असतात. सन 1983 साली श्रीनागनाथ मंदिराच्या पाठीमागे सिद्धी-विनायकाची प्राचीन मूर्ती सापडली, त्यामुळे सध्या तिथे गणेशाचे ही मंदिर बांधण्यात आले आहे.
श्री क्षेत्र महागांव हे श्रीनागेश संप्रदायाचे अध्यात्मिक केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे.त्या मुळे त्याठिकाणी अनेक सांप्रदायिक संतानी लिहलेल्या ग्रंथाचा संग्रह केलेला होता.त्यापैकी कांही ग्रंथ मराठवाडा विद्यापीठा कडे जतन करून ठेवलेले आहेत.
श्री क्षेत्र महागांव येथे मठातील मूळ पुरुषांची व तद्नंतरची अशा दोन समाध्या सुमारे तीन कि.मी. अंतरावर व एकवेशी जवळ असून स्थानिक लोक त्यांची अद्यापही भक्ती भावाने पूजा करतात.