भक्त बातकव्वा

सोलापूर जिल्ह्यात मार्डी (ता.उ.सोलापूर) हे गांव आहे.त्या काळी मार्कंडेयपूर किंवा मारडी असे दोन्ही नावाने संबोधीत.ह्या गावात सिरगिर नावाचे एक वाण्याचे कुटुंब राहात होते.त्या सिरगिरला बातकव्वा नावाची सुलक्षणी, लहानपणापासून देवाविषयी ओढ असलेली व विरक्त मनाची अशी मुलगी होती.
मुक्ती कामाचा विचार करी| लाभेल का मज गुरु कैवारी ||
अहर्निशी विचार भारी | सात्विक बातकव्वा ||
पुढे काही कालांतराने तिला श्रीनागनाथ नावाचे कोणी मोठे सत्पुरुष वडवाळ/मानूर येथे राहतात असे समजले.एके दिवशी आपल्या पित्यासमवेत वडवाळ/मानूर येथे श्रींच्या दर्शनासाठी गेली.तेथे त्यांचे दर्शन घेताच तिला तिचे अंतर्मन सांगू लागले की, हेच आपले गुरु होत.त्यामुळे तिने अत्यंत मनोभावे त्यांचे दर्शन घेतले.परत पित्याबरोबर स्वग्रामी गेली.पुढे तिने दररोज वडवाळ/मानूर येथे जाऊन श्रींचे दर्शन घेण्याचा निश्चय केला व त्या प्रमाणे ती वागू लागली.
दर्शनामाजी जडली भक्ती | शांती आराणुक होय वृत्ती ||
अद्भूतची नागनाथ शक्ती | दृढभक्ती कोंभली ||
पुढे ती उपवर झाली.तिचे वडील तिच्यासाठी वर शोधू लागले त्यांना त्याच गावातील मुडके यांचा सुपुत्र वर म्हणून लाभला.योग्य तिथीस बातकव्वाचा विवाह झाला.ती सासरी राहू लागली.जरी ती सासरी राहू लागली तरी तिने श्रीदर्शनाची आपली सेवा चालूच ठेवली.ह्या तिच्या वर्तनाने सासरी तिला जाच होऊ लागला.सासरचे लोक तिच्यावर संशय घेऊ लागले.पुढे तिला जाच फारच होऊ लागला तरी तिने त्या घरातील सर्वांची सेवा मनोभावे करण्याचे सोडले नाही.ह्या लोकांची सेवा करुन राहिलेल्या वेळात ती वडवाळला श्रींच्या दर्शनास जाई.
एके दिवशी घरातील लोकांनी जाऊ न देण्याचे ठरविले.त्यासाठी तिला घरातच कोंडून ठेवले व खोलीला कुलुप लाविले.संध्याकाळी पाहतात तर सर्वांना ती बाहेरुन येत असलेली दिसली.घरांत पाहिले तर दाराची स्थिती कायमच आहे.हे आश्चर्य पाहून त्यांना बातकव्वाच्या थोरवीची कल्पना आली.पुढे त्यांनी तिला त्रास देण्याचे बंद केले.सासरच्या मंडळीसह ती त्यांच्या दर्शनास वडवाळला / मानूरला गेली.मुडके लोकांनी श्रींचे दर्शन घेतल्यावर त्यांचाही भाव श्रींवर बसला.पुढे श्रींनी बातकव्वाला सांगितले ‘ तू इकडे येण्याचे श्रम करू नकोस.मी तुझ्या गावी येतो.मी जंगम रुपात येईन.’ त्याप्रमाणे श्रींनी तिला तिच्या गांवी जंगम रुपात दर्शन दिले. त्यावेळी तिने श्रींना वर मागितला की,
बातकव्वा मागे वर | सन्निधचि ठेवावे निरंतर |
संचार होऊ दे मस्तकावर | जगदोध्दार करावया ||
त्या वेळी नागेश म्हणाले ठीक आहे.त्याचवेळी बातकव्वाने मार्डी येथे त्याच स्थानी समाधी घेतली.मुडके यांनी श्रींचे मंदिर शेजारीच उभे केले.जगदोध्दार होण्यासाठी श्रींनी सांगितले की, मी प्रतिवर्षी वायुरुपात येईन व सर्वांना दर्शन देईन. येथेही हेग्रसास व मार्कंडेय ऋ षीस उत्सवात एकेक दिवस भेट देईन.त्याप्रमाणे प्रतिवर्षी उत्सव होत असतो.
ग्राम सन्निध लाणी निश्चये केली | पुजोनी तया पवित्रचि केला |
प्रगटली तेथे गुरु मावुली | धन्य ते ग्राम ||
धन्य ते मार्डीवासी जन | धन्य ती बातकव्वा |
अशा प्रकारे बातकव्वास वर दिला म्हणून तिच्या प्रेमासाठी मार्डी येथे उत्सव सुरु केला व तेथील अनेकांचा त्यांनी उध्दार केला.
भक्त बातकव्वा ही श्रीसद्गुरु नागनाथांच्या दर्शनाला श्रीक्षेत्र वडवाळला जात होती ? का श्रीक्षेत्र मानूरला जात होती ? आजपर्यंत उपलब्ध असलेल्या चरित्र संग्रहावरुन
1. श्रीअज्ञानसिध्दकृत अभंगातून वर्णिलेले वर्णन
2. संत कवी श्रीउद्धवचिंद्घन
3. श्रीचवंडाबाबा
4. श्रीअनंतबल्लाळ
5. भानजी त्र्यंबक देशपांडेकृत नागेश लीलामृत
इतक्यांची चरित्रे संप्रदायात उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे चरित्रांच्या सर्वच घटनांचा उल्लेख चवंडा बाबा व नागेश लीलामृत सोडुन इतर चरित्रातून आढळून येत नाही.या चरित्रातून सुध्दा विसंगती दिसून येते. चवंडाकृत नागनाथ चरित्र हे शके 1560 साली लिहल्याचे स्पष्ट दिसून येते.आजपावेतो या चरित्राला 378 वर्षे पूर्ण होतील. भानजी त्र्यंबक देशपांडेकृत नागेश लीलामृत हा ग्रंथ मध्यंतरी जो प्रकाशीत झाला होता, त्यामध्ये ग्रंथ समाप्तीचा काळ शके 1270 असल्याचे स्पष्ट दिसते.व त्यांच्याच वंशातील लोकांकडे लेखकाच्या काळासंबंधी विचारणा केली असता, सुमारे चार पिढ्याचा काळ मागे जातो.म्हणजेच दिडशे ते पावणे दोनशे वर्षे आजपासून मागे जातो.या काळाच्या तफावतीमुळे ग्रंथ लेखनाचा काळ निश्चित करता येत नाही.चवंडा व देशपांडे यांच्या दोन्ही चरित्र वर्णनात तफावत असल्याचे कारण चवंडा चरित्र हे अप्रकाशित असावे असे वाटते.चवंडा चरित्रात मार्डीतील बातकव्वा श्रीनागनाथांच्या दर्शनाला वडवाळ येथे जात होती हे संयुक्तीक वाटते. देशपांडे यांच्या चरित्राप्रमाणे बातकव्वा श्रीनागनाथांच्या दर्शनाला मानूर येथे जात होती असे वर्णिलेले आहे असे दिसते.
दोन्ही चरित्रातून बातकव्वाला सासरी त्रास होता.हा विषय सारखा आहे हे मात्र खरे.मार्डी – वडवाळ हे अंतर, मार्डी – मानूरपेक्षा कितीतरी पटीने कमी आहे.या सर्व गोष्टींचा भाविकांनी विचारपूर्वक विचार करावा.त्यांच्या मनाला जे योग्य वाटेल तेत्यांनी स्विकारावे, ही नम्र विनंती.