श्री बोलेराम(नरसिंह)

आपेगावात नृसिंह व रामचंद्र असे दोन बंधू राहात होते. ते काश्यप गोत्रातील व वाजसनीय शाखेचे अध्ययन करणारे होते.दोघेही धर्मशील व नित्याविधी करण्यात समर्थ असलेले असे होते.परंतु दोघांच्या मनोवृत्तीत थोडासा फरक होता.तो फरक म्हणजे रामचंद्र हा व्यवहारी तर नृसिंह संन्यासी मनोवृत्तीचा होता.प्रसंगानुसार रामचंद्राला बाहेर गांवी जावे लागत असे.अशा रितीने बाहेरचे काम करून परत आल्यानंतर ईश्वर प्राप्तीसाठी गृहत्याग करण्याची कशी आवश्यकता असते हे त्यांनी नृसिंहाला पटवून दिले.त्याच्या उपदेशाचा मोठा परिणाम नृसिंहाच्या मनावर झाला व ईश्वर प्राप्तीसाठी त्याने ताबडतोब गृह त्याग केला.श्री नृसिंह तेथेच असलेल्या एका अरण्यात जाऊन देवीची उपासना करू लागले.थोडयाच दिवसात त्यांना दृष्टांत झाला की, त्यांनी मार्कंडेयपुरासी जावे. हे मार्कंडेयपूर म्हणजेच हल्लीचे मार्डी गांव (ता.उ.सोलापूर) होय. येथे हेमाडपंथी पद्धतीचे यमाई देवीचे देऊळ आहे व तेथे अनुष्ठान केल्यावर कांही दिवसांनी त्यांना पुन: दृष्टांत झाला की त्यांनी तुळजापूरला जावे व असेच उग्र अनुष्ठान आरंभावे तेथे त्यांनी घोर अनुष्ठान केले त्यांना देवी प्रसन्न होईना तेंव्हा त्यांनी आत्मार्पण करण्याचा ठाम निर्णय केला. यावेळी मात्र देवीने येऊन त्याला कानात ‘ बोलाराम बोलाराम ‘असे म्हणले व त्या दिवसापासून त्यांनी स्वत:ला नृसिंह म्हणण्याऐवजी बोलाराम असे संबोधण्यास सुरुवात केली. त्यावेळी मात्र देवीने सागितले की, ‘ तुला सद्गुरू भेटण्याची वेळ आलेली आहे.व ते सद्गुरु मानूरहून निघून मोहोळला जाण्यास निघालेले आहेत. व मी सांगते त्या ठिकाणी तू त्यांची प्रतीक्षा कर म्हणजे तुझी व त्यांची गाठ पडेल.’ देवीने सूचित केल्यानुसार बोलारामांची व श्रीनागनाथांची गाठ पडली.या ठिकाणी त्यांची भेट झाली त्या ठिकाणाला तीर्थक्षेत्राचे स्वरुप प्राप्त झालेले आहे व तेथे जवळच भोगावती नदी वाहते व आजूबाजूला झाडी सुद्धा भरपूर आहेत.
येथे बोलाराम यांनी श्रीनागनाथांची भरपूर सेवा केली व श्रीनागनाथांच्या दर्शनाला सुद्धा बरेच लोक तेथे येऊन गेले व त्या गावाचे नामांतर देवगांव झाले ( कारण देव प्रत्यक्ष येथे राहिले) याचेच आज रूपांतर देगांव या नावामध्ये झालेले दिसते. श्रीनागनाथांनी याच ठिकाणी बोलारामांचा त्यांच्या मागणीनुसार उद्धार केला.श्रीनागनाथांच्या दर्शनाने सेवेमध्ये आपले आयुष्य घालवून शेवटी भोगावती नदीच्या तीरावर त्यांनी समाधी घेतली.
नागनाथास मागे वर । भेटी द्यावी मज निरंतर ।
संतुष्ट जाहले गुरुवर । वर स्मरणात दर्शन ॥
अत्यंत महत्वाची घटना अशी की त्या वेळेपासून देगांव येथे श्रीनागनाथांचे मंदिर बांधले गेलेले असून त्यांचा उत्सव दरवर्षी अश्विन महिन्यातील शुक्लपक्षातील अष्टमी व दशमीला साजरा केला जातो.
प्रति संवत्सरी अश्विन मास ।शुक्लपक्षी अष्टमी दशमीस ।
नागनाथ उत्सव अति उल्हास ।सदैव साक्ष बोलाराम।
येथून पुढे श्रीनागनाथांचा संचार चंद्रमौळी गावाकडे येण्यासाठी सुरू झाला.