श्री बहिरंभठ

.

पैठणला कौण्डिण्य गोत्री बहिरंभट नावाचा वेद शास्त्र संपन्न विद्वान पंडित राहात होता.हा बहिरंभट ब्राह्मण एकदा घरी जेवावयास बसला होता.जेवणात त्यावेळी एकदा एका भाजीला मीठ नव्हते म्हणून त्यांनी आपल्या पत्नीस हाक मारून सांगितले की, ‘ आज भाजीस मीठ नाही.’ हे ऐकून त्यांच्या पत्नीने उत्तर दिले की, ‘आज वयाची साठ वर्षे झाली तर आपल्या जीभेची चव अजून गेली नाही यावर तुम्हांस काय म्हणावे. चवी वाचून अजून नडते तर ह्या देहाचे कल्याण कधी व्हावे.’

तुम्ही ज्ञानी आचारवंत ।लवणाची मानीता खंत ।
कैसे होते साधु संत ।सांगा नाथा मजला ॥

हे ऐकून बहिरंभटांना पश्चाताप झाला.त्यांना आजवर गेलेल्या आयुष्यात आपण कांहीच कमविले नाही याची लाज वाटू लागली.गेले ते आयुष्य वाया गेले, असे तीव्रतेने वाटू लागले.

पश्चाताप होई बहिरंभटा । जागृती दिधलीस या भटा ।
आता रिघतो मी त्या वाटा । त्वाची माझी गुरु मावुली ॥

तू माझे खरे डोळे उघडलेस आज पासून तूच माझी गुरू आहेस असे म्हणून आपल्या पत्नीच्या पायावर त्यांनी डोके ठेवले व मी माझ्या जीविताचे कल्याण केल्याशिवाय तुला तोंड दाखविणार नाही असे म्हणून घरदार सोडून आत्मकल्याणास्तव ते घराबाहेर पडले,

माथा लववी पायावर ।त्वाची गुरू माझा थोर ।
चाललो मी आता सत्वर ।गुरू शोधात भामिनी ॥

सद्गुरू शोधण्यासाठी ते दूरपर्यंत गेले, ‘मला कोण आत्मकल्याणाचा मार्ग दाखविल?’हा प्रश्न लोकांना विचारीत.पुढे त्यांना यवन लोक भेटले.त्यांनी सांगितले आमच्या धर्माचा तुम्ही स्विकार करा.आमच्या धर्माच्या आचरणामुळे तुम्हाला आत्मकल्याणाचा मार्ग निश्चित मिळेल व तुमचे जीविताचे कल्याण होईल. पण त्यासाठी

आधी करावे धर्म परिवर्तन ।शिखा त्यजुनी सुनता करोन ।
मागुती पावेल देव हे जाण ।करी धर्म परिवर्तंन ॥

ह्याप्रमाणे त्यांनी ब्राह्मण धर्म सोडून यवन धर्म स्विकारला.यवन धर्माप्रमाणे सुनता करून घेतली.रोज नित्य स्नान-संध्या, वेद पठण करावयाचे सोडून दिले.रोज यवन धर्माप्रमाणे कुराण कलमांचे वाचन सुरू केले, नमाज पडण्यास सुरूवात केली. पुढे कांही दिवस झाले तरीही त्यांचे मन ह्या धर्मांचरणांत रमेना, शेवटी त्यांनी यवन धर्माचा त्याग करावयाचे ठरविले, पुढे फिरत फिरत त्यांना शास्त्री पंडित, आचार्य लोक भेटले त्यांनी त्याना पुन: हिंदु धर्म स्विकारावयास सांगितला. त्याप्रमाणे त्यांनी तो धर्म स्विकारला.पण त्यांच्या शरीरावर दोन्ही धर्माच्या खुणा होत्या.हिंदु धर्माप्रमाणे कानाला छिद्रे होती.आणि यवन धर्माप्रमाणे सुनता केलेली होती.जरी धर्मांतरे झाली तरी ह्या दोन्ही गोष्टी जशाला तशाच होत्या.त्यामुळे ‘मी नेमका कोण?’हाच प्रश्न त्यांच्यापुढे यक्ष म्हणून उभा राहिला.सद्गुरूंचा लाभ होण्यासाठी घरा बाहेर निघाले असता हा दुसराच प्रश्न त्यांना अस्वस्थ करू लागला.ज्याला त्याला मी हिंदु का मुसलमान हाच प्रश्न विचारू लागले.भ्रांतीष्ट चित्ताने ते इकडे तिकडे फिरू लागले.त्यांच्या प्रश्नाचे कोणीही समाधान करू शकेना. असेच भ्रमीष्ट अवस्थेत फिरत असतांना वडवाळ गांवी कोणी एक नागनाथ नावाचे सत्पुरुष आहेत तेच तुमच्या प्रश्नांचे उत्तर देतील अशी ग्वाहीसदृश बातमी त्यांना कळली.ते त्या वडवाळ गावाचा शोध घेत घेत श्री नागनाथांच्या पुढे आले व त्यांनी श्री नागनाथांना प्रश्न विचारला.

इतकी खबर ऐकूनी । भैरंभट आले धावूनी ।
देव देखिला नयनी । लागला चरणी ॥
बहिरंभट हो देवासी ।काय बोले त्यासी ।
मी हिंदू का मुसलमान । इतुकेच मनी जाण ॥
-अज्ञानसिद्ध

त्या भ्रांतीष्ट अवस्थेतील बहिरंभटास श्री नागनाथांनी पाहिले व

देवे खडग् घेतीले । मस्तकी घातिले ।
चारी सेवक पाचारिले ।कांडूनी कुंडनी बारीक केले ।
त्याचे मेण हो बनविले ।
त्याला शिष्याकरवी धरून उखळात घालून कुटून त्याच्या मांसाचा गोळा बनविला.त्या मांसाच्या गोळयावर अग्निसंस्कार केला.

अग्निसंस्कार दिधला तयाला । दिव्य दृष्टीने अवलोकिला ।
करूणामृत सिंचला गेला । तया गुरू मावुली कृपे ।

असे होताच बहिरंभटात जीव आला ते सावध झाले.

बहिरंभट सावध झाला ।पाहतो आपणाला ।
जैसा मातेच्या उदरी ।पूतळा जन्मला ॥
तैसा दिसू हो लागला ।नागनाथ देखिला ॥
-अज्ञानसिद्ध

त्यावेळी श्रीनागनाथांनी विचारले तू कोण आहेस हे आता तू सांग. हा प्रश्न करताच

धावुनि चरणासि लागला ।शिरी हस्त ठेविला ।
बहि-या पिशाच्या दातारा ।तारक नागेश्वरा ॥

श्रीनागनाथांनी त्यांना दिव्य दृष्टी दिली. त्यावर बहिरंभट म्हणाले

सिद्धोहं सिद्धोहं मुखी ऐसा बोले ।
मागुती गडबड लोळण चरणावरी लोळे ।
सवेचि उठवूनी बाजू सन्निध बैसविले ।
स्वानंदे कुरवाळूनी निजरूपी मिळविले ॥

तद्नंतर बहिरंभटाने आपले सर्व आयुष्य श्रीनागनाथांची सेवा करण्यात घालविले.श्रीनागनाथांना त्यांनी वर मागितला.शेवटी आपला देह श्रीनागनाथ चरणी लीन त्या वडवाळ क्षेत्री केला.तेथेच त्यांची समाधी बांधली.

अद्यापि वडवाळ क्षेत्राला ।समाधी उखळ साक्ष भला ।

या दोन्ही गोष्टी (श्री बहिरंभट समाधी व त्यांना कुटलेले उखळ)श्री वडवाळ क्षेत्रात अद्यापि आहेत. बहिरंभटाने घरांतून बाहेर निघण्यापूर्वी विद्वान असल्या कारणाने बरेचसे काव्य केले आहे.सर्वात मोठे म्हणजे श्रीमद्भागवताच्या दशम स्कंधावर टीकात्मक असे ‘ भैरवी टीका ‘ नामक ग्रंथ जवळ जवळ पाऊण लाख ओव्यांचा त्यांनी रचिला. तो अद्यापि अप्रकाशित आहे. कांही जण तो छापण्याचा स्तुत्य कार्यक्रम करीत आहेत. ह्या ग्रंथात ते आपल्या गुरूंचे नांव चिंतामणी घेतात.पुढे श्री क्षेत्र वडवाळ येथे आल्यावर त्यांना श्रीनागनाथ हे सद्गुरू लाभले.व शेवटी आपली जीवनयात्रा त्यांच्या चरणी अर्पण केली.धन्य ते बहिरंभट.